प्रेरणा, सार्वभौम उर्जा आणि पुनर्जन्म
शब्दांना कशी चाल द्यावी हे उकलत नाही. परंतु तरीही हा माझा छोटासा प्रयत्न. तसा हा उशीरच झाला. परंतु मनातील धगधग, भावना योग्य वेळी प्रकटल्या नाहीत तर तेही अयोग्यच आहे. म्हणून हा प्रयत्न. जीवनातील काही घटना अशा असतात की, त्यानंतर आपले भावजीवन कायमचे बदलुन जाते. तशीच एक घटना माझ्याजवळ घडली.
18 ऑगस्ट 2019 चा दिवस विसरता येणे शक्य नाही. एवढ्या भीषण अपघातातून मी वाचलो हा दैवी चमत्कारच मानतो तसा तो चमत्कार झालाही आणि मी वाचलो. दुर्दैवाने संपूर्ण एसटीबस उभी कापली जावूनही माझे सुदैव म्हणून मला केवळ उजव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली. माझ्या पेक्षाही इतरांना ज्या दुखापती झाल्या, ज्यांचे निष्प्रभ प्राण गेलेत ते भयंकरच होते. उर्वरीत संपूर्ण प्रसंग तर सर्वांनाच ज्ञात आहे. तो परत आठवण करवत नाही. भाग्यवंतांच्या यादीत माझा नंबर लागला.
आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनमोल असा ठरत गेला. सर्वप्रथम जवळ आले ते प्रशांत, कृष्णा आणि अजय. त्यांनी मला हॉस्पीटलला नेले. हॉस्पीटलला माझी वाट पाहत असलेले योगेशराव, रवीराव, माई, यामिनी आणि घरी मायेच्या ओढीनेच माझ्या जवळ आलेले आई, काका-काकु, राजश्री काकु,धर्मपत्नी गीता, संजय मामा, प्रज्ञा, ममता,अमोल, अनुश्री या सर्वांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे अजुनही मला काही उमजत नाही. त्याच रात्री मित्रवर्ग धीरज, अविनाश यांची उडालेली घाबरगुंडी,थरथराट आणि त्यातच सर्वांचा माझ्या पर्यंत पोहोचण्याचा आटापिटा पाहिला.
सकाळी आई, काका, गीता, पुण्याहुन जयंत, जयश्री, कौस्तुभ,चिमणी,देव आणि औरंगाबादहुन निलेश, महेश ही सर्व मंडळी तत्परतेने आल्यावर त्यांना असे झाले की, देठ नसलेले फुल हाती असावे तसे झाले. मी जगलो म्हणून हसावे का मला दुखापत झाली म्हणून रडावे तेच कुणाला सुधरेना. जीवनातील काही घटनाच अश्या असतात की, त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे पडते. सर्वांनी मला जवळ येवून पाहिले. कुठे काय लागले याची विचारपुस झाली. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रुंना वाट मोकळी झाली. काकांनी आणि आईने माझ्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला. शब्दांपेक्षा तो स्पर्शच खुप बोलका होता. त्या स्पर्शानेच पुन्हा आयुष्य बहरले. त्यानंतर मला बघायला आलेला प्रत्येक हितचिंतक, नातेवाईक, माझे मित्र फक्त हेच म्हणत की, आई वडीलांच्या पुण्याईने तुझा पुनर्जन्म झाला. खरंच किती पुण्यवान असतात आपले आईवडील. जे स्वत:ची पुण्याई सुध्दा आपल्या मुलांनाच देतात.त्याची प्रचिती आलीच.
![]() |
| Add caption |
त्यानंतर प्राजक्ताचे झाड फुलावे तसे माझ्या जीवनातील या सर्वांच्या आशिर्वादाचे फुलं फुलत गेले. पुण्याईचे बळ वाढीला लागले. मायेला फक्त एकच माहित असते, प्रेम करणे ते ही मुकपणे. परंतु इथे माया आणि काळजी दोघांनी असा घेर मांडला की, मला बरे व्हायला वेळच लागला नाही. नाना, बापूंनंतर माझ्यासाठी, घरासाठी सर्व काही करणारे, आम्हाला कसलीही उणीव न भासू देण्याचा जणू संकल्पच हाती घेतलेले माझ्यासाठी नेहमीच जीव की प्राण करणारे एवढेच नाही तर या जगाची ओळख करुन देण्यापासून आजतागायत माझा हात घट्ट धरुन ठेवणारे विजु काका यांच्या प्रेमामुळेच, परिवाराने दिलेल्या प्रोत्साहनाने मला लवकर चालायचे बळ दिले. शारिरिकदृष्टया माझा एक हात निकामी झाला असतांनाही एवढे हात माझ्या पाठीला मिळाले की, मी या माझ्या निकामी हाताची पर्वा चिंता करण्याची गरजच पडली नाही. या सर्वांचा उतराई होणे अशक्यच.
कृष्णा आणि प्रशांतने खुप काळजी घेतली. थोडी थोडकी नव्हे तर आतापर्यंत. त्याचा सतत उच्चार असायचा, ‘भाऊ, हात सांभाळ. तु नको करु. मी करतो, राहु दे’. आज जो संपूर्ण मी बरा झालो त्याचे सर्व श्रेय एवढ्या मोठ्या दृश्य अदृश्य परिवाराचे आहे. जवळपास वर्षभर मला भेटायला येणारे सर्व ज्ञात अज्ञात नातेवाईक, मित्रवर्ग यांच्या ऋणातच कायम रहावेसे वाटते. अखंड विश्वात माझ्या इतका आनंदी कोणीही नसेल की ज्याला एवढा मोठा परिवार मिळाला. खुप आहे लिहीण्यासारखं पण सद्या एवढच. लोभ आहे तो वृद्धिंगत व्हावा.
आपलाचहेमंत भाऊ

